बाबासाहेबांचा अपमान करणा-या खा.संजय राऊतांची सेनेतून हकालपट्टी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे असून,राज्यघटनेचा आणि ती देणाऱ्या भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या राऊत यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी करावी,अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी फेसबुकवर पोस्ट करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे.हल्ली शिवसेनेचे खासदार राऊत या नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे की ? कोणा दुसऱ्या नेत्याच्या प्रभावाखाली शिवसेनेसारख्या संघटनेला खड्यात घालण्याचा कार्यक्रम चालवला अशी शंका येण्यासारख्या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत.पक्षाचे मुख्य प्रवक्ता आणि महाभारतातील संजयप्रमाणे आपल्याला ‘दिव्यदृष्टी’ आहे असा ज्यांचा आविर्भाव असतो अशा संजय राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाबद्दल जी वक्तव्ये केली आहेत,ती तर अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहेत,अशी टीका लाड यांनी केली आहे.आपल्या देशात न्यायालयांचे निर्णय हे अंतिम मानले जातात.निर्णयांची थोर परंपरा आपल्याकडील सर्वच न्यायालयांना आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असो,वेळ आल्यावर न्यायालये सरकारच्या निर्णयावर तुटून पडतात.त्यामुळे राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवरही संकटांत कोणताही निर्णय घेताना सारासार विचार करून तो घ्यावा लागतो घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना भारताला दिली, त्यात न्यायालयांना अनन्यसाधारण महत्व आहे.आज देशातील सर्वसामान्यांचा सर्वाधिक भरोसा हा न्यायव्यवस्थेवर आहे.अशा परिस्थितीत न्यायालयाच्या निर्णयावर आणि त्याआधी अनेकदा सर्वोच्च न्यायालयावर राऊत यांनी पातळी सोडून टीका केली आहे असे लाड यांनी म्हटले आहे. हा घटनेचा आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे.राऊत हे सध्या आपण सर्व व्यवस्थांच्यावर आहोत असे,समजू लागले आहेत.अपमानाची जबाबदारी घेवून शिवसेनेने राऊत यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी करताना राऊत यांची हकालपट्टी करताना त्यांना खासदारपदावरून पदच्युत केले पाहिजे,असेही लाड यांनी स्पष्ट केले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने कांजुरमार्ग येथील प्रस्तावित असलेल्या मेट्रो कारशेडला स्थगिती देत,राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.केवळ अहंकारातून आणि सारासार विचार न करता ठाकरे सरकारने आधीच्या सरकारचा निर्णय बदलत आरे येथील वेगात सुरू असलेले मेट्रो कारशेडचे काम थांबवले आणि ती कारशेड कांजूरमार्गला हलविली अशी टीकाही लाड यांनी सरकारवर केली आहे.

मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पाची आपण ऐसीतैसी करत आहोत,याचे भान या सरकारला राहिले नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सरकारच्या निर्णयाच्या चिंधड्या उडवल्यामुळे खवळलेल्या राऊत यांचा तोल गेला आणि त्यांनी न्यायालयावर थेट राजकीय आरोप केले.“न्यायालय हल्ली कशातही पडतात.खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरचे न्यायालय जमीन देते. बेकायदा बांधकाम तोडण्याची कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवले जाते.देशाच्या न्यायव्यवस्थेला असे कधी पाहिले नव्हते.कांजुरच्या जागेवर कोणी राजकारणी बंगले किंवा फार्म हाऊस बांधणार नाही आहेत. विरोधी पक्षाने हा विषय राजकीय केलेला असताना न्यायालायाने त्यात पडू नये,” असे राऊत यांनी म्हटले आहे.राऊतांचे हे म्हणणे न्यायालयाला शहाणपणा शिकवण्याचा प्रकार आहे.यापूर्वीही त्यांनी तो केलेला आहे.न्यायालयाने त्यांनी त्यासाठी ताशेरेही ओढले आहेत. खासदाराने खासदारासारखे बोलावे,असे खडे बोल सुनावले होते.पण खासदार महोदयांनी त्यातून कोणताच धडा घेतलेला नाही.त्यांची जीभ घसरतेच आहे.न्यायालयाला आणि विरोधी पक्षाला दुषणे देण्याआधी राऊत यांनी आधी स्वतःच्या पक्षाला आणि पक्षातील आपल्या नेत्यांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायला हव्या होत्या असा, टोलाही लाड यांनी या पोस्टमधून लगावला आहे.
राज्याचे,येथील जनतेचे आणि सरकारचेही हित कशात आहे,याची जाण ठेवत सरकारने आणि ते चालवणा-यांनी निर्णय घ्यायचे असतात.मात्र कारशेडच्या बाबतीत ‘आले राजाच्या (आणि राजपुत्राच्या) मना तेथे कोणाचे चालेना,अशी सध्या महाराष्ट्रातील सरकारची परिस्थिती असल्याची टीका लाड यांनी केली आहे.सरकारमधील इतर दोन पक्ष शिवसेनेच्या अशा एकांगी आणि ‘अहं’ सुखावण्यासाठी घेतलेल्या निर्णयांशी सहमत नसतील. पण त्यांचाही नाईलाज आहे त्यांना तोंड दाबून मुक्क्यांचा मार बसत आहे.’सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे असेही लाड यांनी म्हटले आहे.मात्र न्यायालयांवर आणि त्यांच्या निर्णयावर टीका करणाऱ्या राऊत यांच्या या दुःसाहसाची जबाबदारी सरकारला आणि त्यातील तिन्ही पक्षांना घ्यावी लागणार आहे. अशाप्रकारे न्यायालयांना टार्गेट करणे,ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही.याआधीच्या कोणत्याच सरकारने किंवा सत्तेतील पक्षाने असे केलेले नाही. ही एका अर्थी महाराष्ट्राला कमीपणा आणणाटी गोष्ट असल्याचे लाड यांनी म्हटले आहे.

Previous articleबाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग महाविकास आघाडी सरकारवर नाराज
Next articleमेट्रो कारशेडच्या वादात शरद पवारांची मध्यस्थी,पंतप्रधान मोदींची भेट घेणार