मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राला तीन वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांचे एकत्र सरकार मिळाले आहे.शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष गेल्या वर्षभरापासून एकत्र सरकारमध्ये आहेत.महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधक वारंवार करताना दिसतात.परंतु या टीकेची संधी विरोधकांना न देण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेसोबतच्या आघाडीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी यावर भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा,लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांची बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते आणि उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे.महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत.पण,आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे.स्थानिक पातळीवर सेनेशी जुळवून घ्या,अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली जात होती.
आजच्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक, राजेश टोपे यांसह अन्य नेत्यांची उपस्थिती होती. उमेदवारांना मिळालेली कमी मते, पराभवाची कारणे, मतदारसंघातील पक्षाची स्थिती आदींवर बैठकीत चर्चा झाली. पराभूत झालेल्या उमेदवारांवर पक्ष दुर्लक्ष करत असल्याची भावना असल्याने काहींमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे येत्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती रोखण्यासाठी पराभूत उमेदवारांना आजच्या बैठकीतून बळ देण्याचा प्रयत्न होता, असे बोलले जात आहे.