रात्र संचारबंदीच्या निर्णयावरून मनसेचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आता कुठे कमी होत नाही तेच ब्रिटनमध्ये या विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सतर्कता बाळगली जात आहे. राज्यात महापालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तोंडावर आलेला नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणात रात्रीचे बाहेर पडतात. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असून मनसेने नेते संदीप देशपांडे यांनीही भाष्य केले आहे. त्यांनी ट्वीट करत सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!!”, अशा आशयाचे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. सोबत त्यांनी एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण देखील जोडले आहे. दरम्यान, मुंबईत नाईट लाईफची संकल्पना ही पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी मांडली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप सत्तेत होते. तर आता महाविकास आघाडीचे सराकार सत्तेत आल्यानंतर आदित्य ठाकरे यांची संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबवली जात असल्याचे दिसत आहे. त्यानुसार मुंबईतील हॅाटेल्स, मॅाल्स २४ तास सूरू राहू शकतात. मात्र नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक बोलावली होती.

नाईट कर्फ्यूचा हा निर्णय विरोधकांना फारसा पटलेला दिसत नाही.संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला असल्याचे दिसत आहे. मात्र संदीप देशपांडे यांचे हे ट्वीट त्यांच्यावरच उलटल्याचे दिसत आहे. त्यांच्या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्याचे स्वागत केले आहे. इथे परिस्थिती काय तुम्ही बोलता काय, असे म्हणत नेटक-यांनी देशपांडे यांच्यावर संताप व्यक्त केला. कोरोनाचे केसेस वाढले की तुम्हीच आराडा ओरडा करा,३१ डिसेंबरच्या रात्रीस मनसेचा पाठिंबा आहे का?, असा मिश्किल सवाल विचारत नेटक-यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

Previous articleशिवसेनेसोबत जुळवून घ्या,शिवसेनेबरोबर कायम राहायचंय : अजित पवारांच्या सूचना
Next articleराष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची मोदी सरकारवर घणाघाती टीका