मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : केवळ मिशनसाठीच आईच्या चरणी यायचे असते असे नाही. तर जेव्हा ऊर्जा, प्रेम आणि आशीर्वादाची आवश्यकता असते त्यावेळीस आईची आठवण येते. यासाठी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा समारोप रविवारी इस्लामपूर येथे पार पडला.यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.त्यानंतर ते कोल्हापूरला आले असता त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील यावेळी उपस्थित होते. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जोरदार तयारी करत आहे. तर आज अंबाबाईच्या दर्शनाने याची सुरुवात झाली, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.अंबाबाईचे दर्शन घेऊन आपण कोणत्या मिशनची सुरुवात करत आहात का ? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला. त्यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “केवळ एखाद्या मिशन करताच आईच्या चरणी यायचे नसते. तर जेव्हा ऊर्जेची, प्रेमाची आणि आशीर्वादाची आवश्यकता असते तेव्हा आईची आठवण येते. त्यामुळे कुठलेही मिशन नाही, केवळ आईच्या आशीर्वादासाठी आलो”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच २०२० हे वर्ष सर्वांना अडचणीचे गेले. पण २०२१ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान ऐश्वर्याचे जावो, असा आशीर्वाद मी आज अंबाबाईच्या चरणी मागितला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान,राज्यातील पाच मोठ्या महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, नवी-मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या पाच महानगरपालिकांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे निडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या निडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि विशेषतः चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप तयारीला लागल्याचे दिसत आहे.