मला त्यांची भीती वाटतेय… चंद्रकांत पाटलांच्या तक्रारीवर राऊतांचा बोचरा बाण

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेला ‘सामना’ काही नवीन नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या याच ‘सामना’ वृत्तपत्रातून केल्या जाणाऱ्या लिखाणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.सामनातील भाषा गलिच्छ असून संपादक रश्मी ठाकरे यांना आपण पत्र लिहिणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. पाटलांच्या या विधानावर आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदर संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. संजय राऊत यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले असून आपल्याला त्यांची भीती वाटत असल्याचे मिश्किलपणे त्यांनी म्हटले.

सामनामध्ये आपल्याविरोधात केले जाणारे लिखाण हे आक्षेपार्ह असून त्यातील भाषा गलिच्छ आहे, अशी तक्रार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.इतकेच नव्हे तर आपण यासंदर्भात थेट रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले होते. यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटत आहे. ते पत्र लिहित आहेत. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील.सकारात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार राहणार आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आलेली असताना नामांतराचा विषयही जोर धरू लागला आहे. तर केवळ निवडणुकीपूरता शिवसेनेला नामांतराचा विषय आठवतो, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. याविषयी बोलताना राऊत म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्याला तीस वर्ष झाली आहेत. आता केवळ कागदावर बदलायचे आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले की मुद्दा निकाली निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आज सामनाच्या अग्रलेखातूनही यावर भाष्य करण्यात आले असून भाजपवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले आहे. “औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना दिली नवी “ऑफर”
Next articleसावित्रीबाई फुले विद्यापीठातील दुर्मिळ चित्रठेवा जतन करण्याच्या मंत्री उदय सामंतांच्या सूचना