मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोसीखुर्द धरण आणि स्थानिक तसेच परिसरातील सिंचन व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली.उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर भाजपने मात्र निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ‘उधार’ राजाचे जाहीर आभार, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी ११ कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी दौरा केला होता. त्यानंतर आज ते पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पध्दतीनेच अनेक कामे हाताळली. त्यामुळे मुख्यमंत्री हे घराबाहेर पडत नसल्याची टीका भाजप नेते वारंवार करताना दिसतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोसीखुर्द या राष्ट्रीय प्रकल्पाला भेट देत तिथल्या कामाच आढावा घेतला. विदर्भात रखडलेल्या सर्व प्रकल्प कामांची पाहणी करणे, तिथल्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन, प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोडाझरी कालव्याची पाहणी केली. ही पाहणी करून निघताना मुख्यमंत्र्यांचा ताफा प्रकल्पग्रस्तांनी रोखला. तर मुख्यमंत्र्यांनी देखील गाडीतून उतरत प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा असा अचानक रोखल्याने पोलिसांचा एकच गोंधळ उडाला होता.