मुंबई नगरी टीम
परळी : परळी पंचायत समितीतील भाजपच्या ‘त्या’ तीन सदस्यांनी आज दुपारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भेट घेऊन विश्वास व्यक्त केल्याने राष्ट्रवादीची खेळी त्यांच्यावरच उलटली असून पालकमंत्री धनंजय मुंडे या प्रकरणी तोंडघशी पडले असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीने भाजप सदस्यांच्या प्रवेशाची केलेली बनवाबनवी कालच उघड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या स्वतःच्याच सभापतींवर अविश्वास ठराव आणला होता त्याची सुनावणी काल झाली. हा ठराव मंजूर व्हावा यासाठी त्यांनी खोटे बोलून भाजपच्या तीन सदस्यांना पळवले होते.सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस नोट काढून भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माध्यमांना सांगितले. वास्तविक ते तीनही सदस्य भाजपच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही,असे असताना या तिन्ही सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची जोरदार चर्चा काल होती. भाजपचे ते तीन सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे व मोहन आचार्य यांनी आज दुपारी वैद्यनाथ साखर कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. या भेटीमुळे राष्ट्रवादीचा बनाव उघड झाला आहे.