मुंबई नगरी टीम
मुंबई : राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो.काही झाले तरी राजीनामा घ्या,असे ते म्हणतात.असे जर म्हणायला गेले तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू.दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे ते राजीनामा मागण्यासारखेच आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे नेते नवाब मलिक आणि धनंजय मुंडे हे वेगेवगेळ्या प्रकरणांमुळे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांना यावेळी संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले.
संजय राऊत हे शुक्रवारी आपल्या परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले होते.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारणात असे आरोप विरोधी पक्ष करत असतो.त्यांना ते करत राहूद्या.असे कितीही आरोप केले तरी हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्ष राजीनाम्याची मागणी करत आहेत. शिवाय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झाले तरी राजीनामा घ्या, असे ते म्हणतात. असे जर म्हणायला गेले तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे ते राजीनामा मागण्यासारखेच आहे,असा टोला त्यांनी लगावला.तसेच प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहिजे असे घटनेत लिहले नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रतिमेला याने धक्का लागलेला नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान,संजय राऊत आज आपल्या कुटुंबासह शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने आणखी एका नव्या चर्चेला उधाण आले होते. मात्र ही एक कौटुंबिक भेट असल्याचे समजते. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीसाठी गेले होते, अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील बडे नेते अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तेच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कराचे आरोप झाले आहेत. यासह नवाब मलिक यांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून यापुढे आणि काय घडामोडी घडतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.