कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार

कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना, दि. 16  शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली .

जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नाला बंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  त्या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, शासकीय योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या माध्यमातून गावाचा कसा विकास, कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडवंची हे गाव आहे.  कडवंचीच्या ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीमधून गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाची आदर्श गाव म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.  कडवंचीचा आदर्श इतर गावांनींही घेऊन गावात जलसंधारणाची कामे करावीत, यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. शाश्वत शेतीच्या अभावामुळेच शेतकरी अडचणीत आहेज.  शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करुन शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत सिंचन मिळाल्यास शेतकरी निश्चित समृद्ध होऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.  शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे.  देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे.   जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous articleमुख्यमंत्री अमित शहा यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
Next articleसौभाग्य योजनेसाठी उर्जामंत्र्यांची केंद्राकडे निधीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here