मुंबई नगरी टीम
मुंबई : एकीकडे राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. तर दुसरीकडे आज मुंबईतही शेतकऱ्यांचे लाल वादळ धडकले. मुंबईच्या आझाद मैदानात शेतकऱ्यांनी ठिय्या दिला असून राज्यातील ठाकरे सरकारने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते मंडळींनी या आंदोलन स्थळी उपस्थिती लावली होती.मात्र महाविकास आघाडीचा हा पाठिंबा ढोंगीपणा असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वाहत्या गंगेत हाथ धुण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
“कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झाले नव्हेत. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत. जे लोक या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा सवाल आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या २०१९ च्या जाहीरनाम्यात बाजारसमित्या रद्द करु असे का म्हटले होते? २००६ साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी महाराष्ट्रात का मंजूर केला? २००६ ते २०२० पर्यंत तो कायदा महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्रातला कायदा चालतो मग देशातला का नाही?’, असा सवाल फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केला आहे.
बाजार समितीच्या बाहेर खरेदीचे परवाने हे कॉर्पोरेटला देण्याची सुरुवात महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीने केली. केंद्र सरकार तर ते देखील देत नाही आहे. ही सगळी ढोंगबाजी सुरू आहे. वाहत्या गंगेत हाथ धुण्याचा हा प्रयत्न आहे. याला शेतकऱ्यांचा कुठलाही पाठिंबा नाही. उलट शरद जोशींप्रणीत तिनही शेतकरी संघटनांनी या तिन्ही कायद्यांचे स्वागत केले आहे. हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.