मुंबई नगरी टीम
नागपूर : “नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करुन लढायचे की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. यावेळी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावली तर नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत देखील परिवर्तन होऊ शकते”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नागपूर महापालिका निवडणुकीतील आघाडीविषयी बोलताना जयंत पाटील यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील हे नागपूरमध्ये आले होते. नागपूर महापालिका निवडणुकीतील आघाडीविषयी जयंत पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले की, “आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेससोबत सल्ला मसलत करून याबाबत निर्णय घेतला जाईल. शेवटी स्थानिक लोकच निवडणूक लढवत असतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्याला अधिक महत्त्व असते. त्यामुळे निवडणुका लागतील तेव्हा त्यांना विश्वासात घेऊनच पक्षाच्या हिताचे निर्णय घेतले जातील”, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच सर्वजण एकत्रित आल्यास नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महापालिकेतही बदल होऊ शकतो. मात्र आपलाच पक्ष मोठा आहे असे म्हटले तर अडचणी येऊ शकतात, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
केंद्राने आधी महाराष्ट्राचे पैसे द्यावेत नंतरच नव्या घोषणा कराव्यात
केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूर आणि नाशिक मेट्रोला निधी देण्यात आला आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला. हा प्रकल्पाचा भाग असून पूर्वीचा निर्णय झालेला आहे. त्यात नवीन काहीच नाही. महाराष्ट्राच्या ज्या गरजा आहेत, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी टीका त्यांनी केली.तसेच केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या घोषणा कुठेही फलद्रूप झालेल्या नाहीत. त्यांनी घोषणा केल्या पण त्याचे पैसेच शेवटपर्यंत पोहोचले नाहीत. आता राज्य सरकारचे जीएसटीचे २७ हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत. आधी आमचे राहिलेले पैसे द्या, मगच नव्या घोषणा कराव्यात, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगण्याकरता अर्थसंकल्पात टाकलेली ही वाक्ये आहेत त्यापलीकडे त्याचे काही महत्त्व नाही, असेही ते म्हणाले.