मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या सत्तर दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा सर्वच स्तरावर होत आहे. शेतकरी आंदोलनामुळे राजकीय वातावरणही तितकेच तापलेले पाहायला मिळत आहे. आज शनिवारी शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक विरोधी पक्ष पुढे आले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर आंदोलनातील शेतकरी खलिस्तानी,दहशतवादी असल्याचा आरोप देखील केला जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून भाजप नेत्यांना फटकारले आहे.“देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी,नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा,महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,” असा संतप्त सवाल सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. तर केंद्र सरकारच्या ९ बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने अनेकदा शेतकऱ्यांचा उल्लेख हा दहशतवादी आणि खलिस्तानी असा केला आहे. मात्र कंगनाच्या अशा वक्तव्यावर भाजप नेते चिडीचूप आहेत. यावरून सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्ल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. दिल्लीतील टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारने अनेकदा चर्चा करूनही यावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली विरोधी भूमिक कायम ठेवत आंदोलन सुरूच ठेवले आहे. नुकत्याच प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचावरूनही भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली होती. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा विषय हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. जगभरातील काही प्रसिद्ध व्यक्तींनी या आंदोलनावर भाष्य केले आहे. तर त्यांच्याविरोधात भारतातील बॉलिवूड कलाकार आणि खेळाडू एकवटले आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनावरून दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे.