मुंबई नगरी टीम
मुंबई । कोणीही यावं,महिलांची अब्रु लुटावी, बालिकांवर अत्याचार करावेत, हे कायद्याचं राज्य आहे का, आघाडी सरकारने कायदा व सुव्यवस्था ‘भगवान भरोसे’ सोडलीय का, असा जळजळीत सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारला केला.
आज विधान परिषदेत विरोधी पक्षाने नियम २६० अन्वये कायदा व सुव्यवस्था तसेच मुंबईचे प्रश्न या विषयी चर्चेचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना दरेकर बोलत होते. दरेकर म्हणाले की,कोणता शाप महाराष्ट्राला लागलाय की,अभूतपूर्व रेकॉर्ड ब्रेक अशी गुन्हेगारी या सरकारच्या कालावधीत झाली आहे. सरकार आल्यापासून गुंड मोकाट सुटले असून विनयभंग,बलात्कार,महिलांवरील अत्याचार खून,दरोडे, चोरी,दंगे,फसवणूक, अपहरण, दुखापत, पोलिसांवर हल्ले, सायबर क्राइमचे २ लाख ४९ हजार २५ गुन्हे घडले. २५ हजार ६२३ विनयभंग, बलात्कार आणि अपहरणाचे गुन्हे एका वर्षात घडले. प्रत्येक दिवशी साधारण ५१ महिलांवर लैंगिक अत्याचार होत होते, ३ वर्षाच्या लहान मुलीपासून ७० वर्षाच्या वृद्ध महिलेवर अत्याचार होत होते, वसईमध्ये तर २०२० च्या जानेवारी ते ऑक्टोबर या केवळ ९ महिन्यात ६२ बलात्कार आणि १६२ विनयभंग झाले. शरमेने मान खाली जावी, अशा प्रकारचे गुन्हे होत असतील आणि राज्य सरकार कायदा सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा करत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी कोणतीच गोष्ट नाही.
पुणे शहराची काय अवस्था आहे, असा सवाल करत दरेकर म्हणाले, २४ तासात १ बलात्कार व २ विनयभंग होत आहेत, अनेक वेळा मी स्वतः भेट घेऊन त्या गुन्हाबद्दल कारवाईची मागणी केली आहे, पोलिसांचा धाक कमी पडत आहे, महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे दाखल देखील करण्यात आलेले नाही, महाविकास आघाडी सरकारवर या राज्यातील जनतेचा विश्वास नसल्याचे दिसत आहे.दरेकरांनी असाही मुद्दा चर्चेत उपस्थित केला की, हिंगणघाट जळीत प्रकरणामुळे राज्यात प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता, सरकार पिडित मुलीचा जीव वाचवू शकले नाही, पिडितेच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा आधार दिला गेला नाही, पिडित महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाईल, कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी दिली जाईल, असे आश्वासन लिखित स्वरूपात देण्यात आले होते,पण सरकारने तेही आश्वासन पाळले नाही.
दरेकरांनी पुजा चव्हाण आत्महत्येच्या विषयावरुन कायद्याचे रक्षण करणारी मंडळीच जर भक्षक झाली तर लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित केला. कायद्याचे रक्षण करणारेच जर गुन्हे करत असतील, गुन्हेगारांना पाठबळ देत असतील तर जनतेच्या मनात कायद्याबद्दल, न्यायाबद्दल विश्वास राहणार नाही. मुंबईच्या प्रश्नावर बोलताना दरेकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या पार्किंग लॉटच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. मुंबईतील काही बिल्डरांना पार्किंग लॉट बांधून देण्याच्या अटीवर वाढीव एफएसआय दिले गेले, परंतु, बिल्डरांनी एफएसआयचा फायदा घेऊन पार्किंग लॉट महानगरपालिकेला बांधूनच दिले नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्या सर्व बिल्डरांची नावे माझ्याकडे असून ती मी सरकारला देण्यास तयार आहे, असेही त्यांनी चर्चेत सांगितले.