“महाराष्ट्र थांबला नाही,थांबणार नाही”, मग एमपीएससीच्या परीक्षा का थांबवल्या ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी म्हणते, कोरोना काळात महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. मग आज या परीक्षा का थांबवल्या ? परीक्षा नाही तुम्ही विद्यार्थ्यांचं भविष्य थांबवल आहे. कोरोना काळात नियोजन करावं लागतं, एमपीएससी परीक्षांबाबत या सरकारने काहीच नियोजन केलं नाही. केवळ कोरोनाचे कारण दाखवून परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. काहीच न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळायचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाविरोधात एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्यावर दरेकर म्हणाले की, सरकारचं कोणत्याही गोष्टीत लक्ष नाही, हजारो मुलांनी स्वप्न रंगवले असताना अचानक परीक्षा रद्द केल्या. मराठा आरक्षण गृहीत धरून, हजारो मुलांच भविष्य सुरक्षित करत परीक्षा होणं अपेक्षित होत परंतु ठाकरे सरकार बेफिकर असून दोन समाजात वादविवाद निर्माण करत आपली खुर्ची कशी सुरक्षित राहील यामध्ये हे सरकार रमलेलं आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.

कोरोनाचं कारण सांगत असताना, राज्यामध्ये लग्न सोहळा, सत्कार सोहळा, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात पब व चित्रपट शूटिंग सुरू असून पक्षातले मंत्री पोहरादेवीला जाऊन लाखोंची गर्दी करतात याला जबाबदार कोण आहे ? करोनाची काळजी घेऊन अधिवेशन पार पाडलं मग तुम्ही परीक्षेचं नियोजन का करू शकत नाही ? असा सवाल दरेकर यांनी केला.ठाकरे सरकारच्या काळात शिक्षणव्यवस्था,शेतकरी, कामगार तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. परंतु यांचं महाविकास आघाडी सरकार कस टिकवता येईल यांकडेच जास्त लक्ष आहे. दुसऱ्यांना हिटलरशाहीच राज्य बोलत असताना आज मुलांवर लाठीचार्ज होत आहे. तेव्हा राज्यसरकार शांत का आहे, ही मुलं त्यांच्या भविष्यासाठी न्याय मागत असताना सामान्य माणसांचा विचार हे सरकार करणार आहे की नाही ? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच एका बाजूला मराठा आरक्षण, इतर आरक्षण विषय प्रलंबित असताना त्याचा निर्णय घेत, मराठा आरक्षण बघून त्यांच्या जागा सुरक्षित करून सर्व एमपीएसीच्या मुलांच भविष्य सुरळीत आणाव अशी विनंती दरेकर यांनी केली.

Previous articleदहावी,बारावी परिक्षा : ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भात मोहिम राबविणार
Next articleMPSC EXAM : नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा,मार्ग काढण्याचे दिले आश्वासन