मुंबई नगरी टीम
मुंबई । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरून उभी करण्यात आलेल्या गाडी प्रकरणामुळे सचिन वाझे यांना अटक करण्यात केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.तर सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता,असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे.
वाझे प्रकरणामुळे राज्य सरकार आणि पोलीस दलावर शंका उपस्थित करून या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.या पार्श्वभूमीवर कालच पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.त्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडतानाच,मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता,असा गौप्यस्फोट केला होता.फडणवीस यांच्या या आरोपावर राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी खुलासा करीत वाझे यांना पुन्हा सेवेत कुणी घेतले हे स्पष्ट केले.एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला सेवेत पुन्हा घेण्यासाठी आयुक्त स्तरावर एक समिती असून,याचा निर्णय ही समिती घेते.संबंधित समिती आढावा घेऊन पुन्हा सेवेत सामील करुन घेते. त्यानुसार सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतले गेले असे सांगतानाच, फडणवीस यांनी केलेले आरोप हे राजकीय असल्याचे देशमुख म्हणाले.या प्रकरणाची फाईल सरकारकडे येत नाही हे फडणवीस यांनाही माहित आहे.वाझे यांच्यासारख्या एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला सेवेत परत घेण्याचा अधिकार हा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना नाही तर तो अधिकार आयुक्त स्तरावरील समितीला आहे असे देशमुख यांनी म्हटले आहे.