मुंबई नगरी टीम
बीड । बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे.निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले. कर्ज बुडव्यांना बाजूला ठेऊन बॅक नफ्यात आणली, कारभार सुरळीत केला. सुरवातीला लोकांना देण्यासाठी एक रूपया देखील नव्हता, परंतू चांगला कारभार करत लोकांना बोलावून त्यांच्या ठेवी परत दिल्या असे त्या म्हणाल्या.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर झाला. सेवा सोसायटीचे उमेदवार बाद केले. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय केला गेला. जो नियम परभणीच्या बाबतीत तो आम्हाला का नाही ? असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांवर दबाव आणून अजब-गजब पध्दतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न झाला. या निवडणूक प्रक्रियेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून सुरळीत चालू असलेल्या संस्थेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.निवडणूकीची ही संपूर्ण प्रक्रियाच खोटी आहे. केवळ आठ जागेसाठी निवडणूक होत असल्याने तेरा जागेचा कोरम पूर्ण होत नाही, मग निवडणूकच कशाला ? असं त्या म्हणाल्या. येनकेन प्रकारे प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांच्या कारस्थानाचा आम्ही निषेध करतो. उद्याच्या मतदानावर आमचा बहिष्कार आहे असे सांगत सर्व जागांची निवडणूक घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.