मुंबई नगरी टीम
मुंबई । स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासात तपास अधिकाऱ्यांकडून मोठ्या चुका झाल्याचा निर्वाळा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्यानंतरही शिवसेनेकडून वाझेंची पाठराखण कशासाठी केली जात आहे, असा सवाल आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.आज दरेकर यांनी मराठा आरक्षण आणि वाझे प्रकरणाबाबत भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
राज्यात सर्व काही आलबेल आहे, अशा प्रकारचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न सामना वृत्तपत्रातून संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे की पोलीस दलाकडून तपासाबाबत मोठ्या चुका झालेल्या असल्यामुळेच परम बीर सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे. तपासात चुका झाल्या आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आल्याची कबुली एकीकडे गृहमंत्री देतात, दुसऱ्या बाजूला काँग्रेस अशी भूमिका घेते की, काही चुकीचं झालं असेल तर कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र सर्व आलबेल आहे, असं सांगून संजय राऊत सामनातून वाझेंची पाठराखण करतात. त्यामुळे शिवसेना वाझेंची अजूनही पाठराखण का करीत आहे,असा संशय निर्माण होतो. महाविकास आघाडी सरकार विसंवादाने भरलेलं सरकार आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.