मुंबई नगरी टीम
मुंबई । पोलीस बदल्यांसाठी मोठे रॅकेट चालते असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करुन उघड केले होते,असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता मात्र मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने फडणवीसांचा हा दावा धादांत खोटा निघाला असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
राज्यातील पोलीस बदल्यांसाठी मोठे रॅकेट चालते असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करुन उघड केले होते,असा खोटा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने तो दावा धादांत खोटा निघाला असून शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी दहशतवादी कारवायांचे संदेश टिपण्यासाठी घेऊन त्याचा गैरवापर करुन राजकीय नेते व काही अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीपणे टॅप केल्याचे कुंटे यांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.कुंटे यांच्या अहवालामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले असून शुक्ला यांनी अहवालासोबत कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता असे असताना फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन संशय वाढवला व महाराष्ट्राची बदनामी केली.हे कृत्य अत्यंत बेजाबदारपणाचे आहे.अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षासाठी काम करु नये तर जनतेसाठी काम करावे असे अवाहनही पटोले यांनी केले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीची सर्व मुल्ये, परंपरा पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर नवीन कृषी व कामगार कायदे बनवले. या कायद्यांविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही. या आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. हे जुलमी, अन्यायी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद करण्यात आला असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशी गेले आहेत. हा अहंकार असून मोदी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच महागाई, बेरोजगारी विरोधात पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर उपोषण करून मोदी सरकारचा धिक्कार केला. मुंबईत मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.शेतक-यांच्या नावावर वसुल केल्या जात असलेल्या ४ रुपयांतून मोदी सरकार दरवर्षी ७६ हजार कोटी रुपये कमावते आणि जुलमी कायदे आणून शेतक-यांना देशोधडीलाही लावत आहे. केंद्रातील सरकार हे ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे असे पटोले म्हणाले.