मुंबई नगरी टीम
मुंबई । देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला असतानाच राज्यातील परिस्थितीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच आज भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटात केलेल्या कामाबद्दल कौतुक केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्राला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातच विरार,नाशिक सारख्या घटना घडल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पुढे येत असताना अन्य राज्यातील परिस्थिती माध्यमातून पुढे येत नव्हती. मात्र गेल्या आठवड्यापासून गुजरात,उत्तर प्रदेश,राजस्थान,मध्य प्रदेश आणि दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती समोर आल्यानंतर देशातील माध्यमासह,विदेशातील माध्यमांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.राज्यात गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनच्या कमतरतेसह,रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत होता,कमी लसीच्या पुरवठ्यामुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.या सर्व समस्यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामना करीत राज्यातील आरोग्य सुविधा रूळावर आणल्याचे चित्र असतानाच त्यांच्या या कामाचे कौतुक थेट भाजपच्या खासदाराने केले आहे.
Uddhav Thackeray govt needs a small pat in on the back( big pat if trend continues) for lowering the Coronavirus infection rate in Mumbai. I believe even hospitals are now in a better shape
— Subramanian Swamy (@Swamy39) May 1, 2021
भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावून ठेवण्याबद्दल ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी.महाराष्ट्रात हॉस्पिटलही आता सज्ज झालेली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.मुंबईतील रूग्ण संख्या कमी होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने येत्या १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.त्याचाही फायदा झाल्याचे दिसते.आज महाराष्ट्र दिनानिमित्त केलेल्या भाषणात या निर्बंधांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात राहिल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.