मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात.मात्र राज्यात वाढत चाललेल्या कोरोना संकटामुळे आता अशा बदल्या येत्या ३० जूनपर्यंत न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आज त्यासंदर्भातील अध्यादेश जारी केला आहे.
राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या या एप्रिल आणि ने महिन्यात करण्यात येतात.गेल्या वर्षी राज्यातील कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे या बदल्या काही महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या.गेल्या वर्षी ३१ जुलैला बदल्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तो निर्णय १० ऑगस्ट पर्यंत लागू होता.या वर्षीही डिसेंबर आणि जानेवारी महिना वगळता राज्यात कोरोनाचे संकट वाढत गेले आहे.सध्या कोरोनामुळे सर्वच कर्मचा-यांची कार्यालयात किमान उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या आर्थिक वर्षातील एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झाल्याने अधिकारी आणि कर्मचा-यांना बदल्यांचे वेध लागले असतानाच राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अशा बदल्या येत्या ३० जून पर्यंत न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भातील अध्यादेश आज जारी केल्याने आता बदल्यांसाठी अधिकारी आणि कर्मचा-यांना ३० जूनपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच शासकिय विभागातील बदल्यांवर निर्बंध आले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयमुळे सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या ३० जून पर्यंत करण्यात येणार नाहीत.केवळ सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्यात येतील.एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाची साधारण तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची बदली करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचा-याची बदली करण्यात येणार आहे.