मुंबई नगरी टीम
नागपूर । राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.भाजपच्या विरोधात इतर पक्षांनी एकत्र येण्यासाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक झाली असल्याची चर्चा असतानाच,कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून सुमारे तीन तास चर्चा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत.केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इतर पक्षांनी एकत्र येण्यासाठी रणनीती आखण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे बोलले जात असतानाच या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,कोणी कोणाला भेटावे हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होईल असा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे.
प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवार यांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत.भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका मलिक यांनी मांडली.