मुंबई नगरी टीम
मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन राज्यातील सत्तेत सहभागी असलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही. मग ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं धाडस छगन भुजबळ दाखवतील का ? असा थेट सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.
आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. सध्या यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की,छगन भुजबळ राज्याचे प्रमुख नेते असून सरकारमधील ज्येष्ठ व वजनदार मंत्री सुद्धा आहेत. कॅबिनेट मध्ये अथवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न आहे. जर आपल्या समाजाविषयी एवढी कदर असेल व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकराने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं धाडस मंत्री छगन भुजबळ दाखवतील का? असा खोचक सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.