मुंबई नगरी टीम
बारामती । नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अध्यक्षपद नक्की कोणत्या पक्षाला मिळणार यावर चर्चा सुरू असतानाच याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे त्यातच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मी अध्यक्ष होण्यास तयार आहे पण शिवसेनेने वनखाते सोडू नये असे विधान केल्याने अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.मात्र याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खुलासा करीत विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.याबाबत आमच्या तिन्ही पक्षांचा निर्णय झाला आहे.त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा पक्षाचा अध्यक्ष मान्य असून, आम्ही त्या निर्णयावर कायम आहोत,असेही पवार यांनी स्पष्ट केले ते आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्या तिन्ही पक्षात सुरू असणारा अध्यक्षपदाचा तिढा कायमचा निकालात काढला.यावेळी त्यांनी समान नागरी कायद्याबाबतही भाष्य केले. याबाबत केंद्र सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. याचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याने यावर आमचे लक्ष असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याने,महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही,असेही पवार स्पष्ट केले. आम्ही सरकारमध्ये एकत्रित आहोत म्हणजे आम्ही एकत्रित पक्ष चालवत नाही.प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने चालवतात.त्यामुळे स्वबळाची भाषा करण्यात काहीही चुकीचे नाही, असे पवार यांनी सांगितले.