पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला पिंजऱ्यात कैद असलेला पोपट बनवले
नवाब मलिक
मुंबई दि. 23 निवडणूक आयोगाने अद्यापही गुजरातच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. या निवडणुकांमध्ये भाजपला संधी कशी मिळेल यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला पिंजऱ्यात कैद असलेला पोपट बनवले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये पुढच्या महिन्यात निवडणूक घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती. निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला पण गुजरातच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. निवडणूक आयोगाच्या या कृतीने स्पष्ट होते की निवडणूक आयोग भाजपला संधी देण्याचे काम करत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. गुजरातमध्ये भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे. अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल हे युवा नेते भाजपची डोकेदुखी बनले आहेत. भाजपचे नेते पैशांच्या जोरावर या नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप यावेळी मलिक यांनी केला. पैशांचे आमिष दाखवून निवडणूका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.