महाराष्ट्राच्या नावावर नवा विक्रम : राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला आहे.

राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.राज्यात आज सुमारे ४१०० लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

Previous articleराज्यावरचं संकट मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळे : नारायण राणे यांची टीका
Next articleअतिवृष्टीमुळे २९० रस्ते बंद,४६९ रस्त्यांवरची वाहतूक खंडित तर १४० पूल पाण्याखाली