यंदापासून क्रीडा पत्रकारांना शिवछत्रपती पुरस्कार देणार
क्रीडामंत्री तावडे
मुंबई दि. २३ राज्य सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांना देण्यात येणा-या शिवछत्रपती पुरस्कारामध्ये यंदापासून क्रीडा पत्रकारांचाही समावेश करण्यात आल्याची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली.
स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुवर्ण महोत्सवी पारितोषिक वितरण समारंभ २०१७ चे वितरण आज क्रीडा मंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना तावडे म्हणाले की, शिवछत्रपती पुरस्काराची निवड करताना कोणतेही राजकारण वा वशिलेबाजी चालणार नाही. यापुढे क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक पुरस्कारासाठी गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.










