दिव्यांगांसाठी राखीव ३ टक्के निधी निर्धारित वेळेत खर्च करा
मुख्यमंत्री
मुंबई, दि. २४ महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदांचा दिव्यांगांसाठी राखीव असलेला 3 टक्के निधी कोणत्याही परिस्थितीत निर्धारीत वेळेत खर्च करण्यात यावा. हा निधी कोणत्या प्रयोजनावर खर्च करावा याबाबत मार्गदर्शिका तयार करण्यात यावी. या निधीतून दिव्यांगांसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच त्यांच्यासाठी वैयक्तिक उपयोगी साहित्य देण्याबाबतही प्रयोजन असावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नगरविकास आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात आज याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, आमदार बच्चू कडू यांच्यासह सामाजिक न्याय, महसूल, नगरविकास, ग्रामविकास, आरोग्य, अन्न नागरी पुरवठा, परिवहन, गृहनिर्माण, कृषी, रोहयो आदी विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.