मुंबई नगरी टीम
कोल्हापूर। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत.सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे तर माझे नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप लागत नाही.आपल्या मित्राला आपले नाव घेतल्यानंतर चांगली झोप लागत असेल,तर मित्रासाठी त्याला माझी हरकत नाही,असा टोला पाटील यांनी मुश्रीफ यांना लगावला आहे.
महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग,बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खा.किरीट सोमैय्या यांनी केला आहे.याबाबत सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषद घेत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपला उत्तर दिले आहे.मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा दावा करणार असल्याचे सांगतानाच चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केले. माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्या यांनी कुठून लावला ? चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला.
सोमय्या यांनी कुटून बेनामी संपत्तीचा आरोप केला ? कुठून शोध लावला त्यांनी ? सोमय्या या बिचाऱ्याला काहीच माहीत नाही. त्यांना चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यावर हे आरोप केले असा आरोप मुश्रीफ यांनी केला.तर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना सल्ला देत,१०० कोटींचा दावा ही फार छोटी रक्कम आहे. त्यांनी जरा ५००, १००० कोटी रुपयांचा दावा ठोकला पाहिजे. शिवाय अब्रू नुकसानीचा दावा करायला कोर्टात स्टॅम्पसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. तेवढे व्हाईट पैसे आहेत का हे पाहावे ? कारण ब्लॅक मनी तिथे चालत नाही. मग हा पैसा स्वत: भरणार की वर्गणी काढणार, हेही त्यांनी सांगावे असा टोला पाटील यांनी लगावला आहे.