कर्जमाफीच्या यादीत सावळागोंधळ
आधार आणि बँक खात्याचा एकच क्रमांक असलेले अनेक लाभार्थी
मुंबई दि.२५ अत्यंत घाईघाईने राबविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या योजनेतील सावळागोंधळ समोर आला आहे. आधार क्रमांक आणि बँक खात्याचा एकच क्रमांक असलेले अनेक लाभार्थ्यांची नावे यादीमध्ये असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी राज्यातील बँक प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.
मोठा गाजावाजा करत दिवाळीचा मुहूर्त साधत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील सावळागोंधळ पुढे आला आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असलेले लाखो लाभार्थी या यादीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.