सगळ्या यंत्रणांचा वापर करा; महाविकास आघाडीचे नेते घाबरणार नाहीत

मुंबई नगरी टीम

मुंबई | ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यापध्दतीने अजित पवार यांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे असाही आरोप मलिक यांनी केला आहे.

काल जाहीर झालेला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असला तरी ७० टक्के जागा जनतेने महाविकास आघाडीतील पक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे जितकं आम्हाला केंद्रातील भाजप सरकार टार्गेट करेल बंगालसारखी परिस्थिती या राज्यात निर्माण होईल असा इशाराही मलिक यांनी दिला. लखीमपूरमधील घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून राज्यातील जनता केंद्रातील भाजपच्या जुलमी सरकारच्या विरोधात जोरदार पाठिंबा देईल असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleपंकजा मुंडे,विनोद तावडे यांच्यासह चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी
Next articleक्रुझवरील ड्रग्ज पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा ; उद्या भांडाफोड करणार