मुंबई नगरी टीम
सोलापूर । सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक भाजप सोडून इतर पक्षांनी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे असे सांगतानाच,जर योग्य सन्मान झाला नाही,तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवायला तयार आहे,असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे. जर सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे माझे मत आहे. #Solapur
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2021
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा इशारा दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांशी सन्मानाने एकजूट करून निवडणूक लढवली पाहिजे.जर योग्य सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे, असे मत पवार यांनी मांडले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आय कर विभागाने टाकलेल्या धाडी, ईडीच्या कारवाया आणि उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसेवर पवार यांनी भाष्य केले.दिल्लीवरून राज्य सरकारला रोज अनेक गोष्टींवरून त्रास दिला जात असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.मी लखीमपूर येथे झालेल्या हिंसेचा जालियनवाला बागेशी संबंध जोडला. हा उल्लेख सत्ताधाऱ्यांना रुजला नसल्याचे एका सत्ताधारी नेत्याने सांगितले. त्यामुळे छापेमारी करण्यात आली.पण तुम्ही छापा मारा, काही करा. पण मी सामाजिक बांधिलकी सोडणार नाही, असेही पवार यांनी निक्षून सांगितले.
इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून पवार यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला.जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या असताना भारतात किंमती रोज वाढताना दिसत आहेत.याला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे असा सवाल केला जात आहे.लखीमपूर हिंसेंचा निषेध करण्यसाठी महाविकास आघाडीने येत्या ११ तारखेला महाराष्ट्र बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये सहभागी व्हा असे आवाहन करीत, एकही वाहन रस्त्यावर येता कामा नये.कायदा हातात न घेता देशाला संदेश द्यायचा आहे. केंद्र सरकारला धडा शिकवायचा आहे, असेही पवार म्हणाले.आयकर विभागाच्या कारवाईसंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की,मला कळलं की काल अजित पवारांकडे सरकारने काही पाहुणे पाठवले होते.ते पाहुणे येऊन गेले.पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.