मुंबई नगरी टीम
नवी मुंबई । मी पुन्हा येईल..मी पुन्हा येईल..असे म्हणत असताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा आजही आपण मुख्यमंत्री असल्यासारखे वाटतं असल्याचे वक्तव्य केले आहे.येथे झालेल्या एका कार्यक्रमात मला तर आजही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटतं या त्यांच्या विधानावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
Live | महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ | नवी मुंबई @mandamhatre https://t.co/fkMGgkAI3U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2021
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले आहे.गेले दोन वर्ष मी सातत्याने राज्यभर फिरतोय. लोकांचे प्रेम अजिबात कमी झालेले नाही.मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही.मला जनतेने कधीच जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही.आजही मी मुख्यमंत्री आहे हे तुम्ही मला जाणवून दिले आहे. मला तर वाटते मी आजही मुख्यमंत्रीच आहे. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचे, असं फडणवीस म्हणाले.फडणवीस यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसने समाचार घेतला आहे.भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.
मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे, असे फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले, तो धागा पकडून लोंढे पुढे म्हणाले की, फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही.सत्ता हातातून जात आहे असे दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करुन पाहिला पण त्यांचे ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरले. त्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन ‘मी पुन्हा येईन, असा घोषा लावत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही. मविआचे सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसतो. त्यांनी स्वप्नातून बाहेर पडावे आणि आपण सध्या मुख्यमंत्री नाही तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहोत हे वास्तव स्विकारले पाहिजे.भारतीय जनता पक्षात कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही लोंढे यांनी लगावली.