मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीचा तिढा सुटत नाही तोच विधान परिषदेतील स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातील ८ आमदारांची मुदत येत्या १ जानेवारी २०२२ रोजी संपत असल्याने विधान परिषदेतील रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने विधान परिषदेच्या रिक्त होणा-या ६ जागांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
येत्या १ जानेवारी २०२२ मध्ये विधान परिषदेतील ८ आमदार निवृत्त होत आहेत.त्यामध्ये रामदास कदम ( शिवसेना ) मुंबई,भाई जगताप ( काँग्रेस ) मुंबई, सतेज पाटील ( काँग्रेस ) कोल्हापूर, प्रशांत परिचारक ( अपक्ष) सोलापूर,अमरिश पटेल ( भाजप) धुळे- नंदुरबार, गोपीकिशन बजोरिया ( शिवसेना) अकोला- बुलढाणा, गिरिशचंद्र व्यास ( भाजप) नागपूर,अरूणकाका जगताप ( राष्ट्रवादी) अहमदनगर यांचा समावेश आहे.विधान परिषदेतील या ८ आमदारांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपत असल्याने येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होणे अपेक्षित आहे.राज्यात असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी अजूनही मंजूरी दिली नसल्याने विधान परिषदेच्या रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरानामुळे कोल्हापूरसह राज्यातील पाच महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.तसेच राज्यातील सुमारे शंभर नगरपालिकांची मुदत संपली असली तरी या निवडणुका अजून झालेल्या नाहीत.त्यातच राज्य सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्याने प्रभाग रचना करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने या निवडणुका होण्याची शक्यता कमीच आहे.मुंबई महानगरपालिकेची मुदत येत्या फेब्रूवारी महिन्यात संपत असल्याने मुंबई स्थानिक प्राधिकारी संस्था मतदार संघातून रिक्त होत असलेल्या दोन जागांसाठी निवडणूक घेण्यास अडचण येणार नाही.