मुंबई नगरी टीम
नांदेड । काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.त्यांना १ लाख ८ हजार ७८९ मते तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली आहे.वंचीतचे उमेदवार उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली या राखीव मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणूकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली होती तर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपात प्रवेश करून येथून उमेदवारी केली होती.ही पोटनिवडणूकीत सार्वजनिक बांधकाममंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती.या निवडणुकीत 64.95 टक्के मतदान झाल्याने येथिल जनता कोणाच्या पारड्यात कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडी,भाजप आणि वंचित अशी रंगली होती.आज या निवडणूकीची मतमोजणी पार पडली पहिल्या फेरी पासूनच काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर आघाडीवर होते.शेवटच्या फेरी पर्यंत त्यांची आघाडी कायम होती.काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना १ लाख ८ हजार ७८९ मते तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली आहे.वंचीतचे उमेदवार उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली .
पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोली मतदार संघात तळ ठोकून होते.महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मतदार संघ पिंजून काढला होता.भाजपनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी याठिकाणी प्रचार केला होता.पंढरपूर पोटनिवडणूकीनंतर प्रथम जालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपने विजय मिळवण्यासाठी कंबर कसली होती मात्र देगलूर बिलोलीच्या मतदारांनी विजयाची माळ महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या गळ्यात घातली.