राज्यात गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार अपयशी
माहिती अधिकारात “पोलखोल”
मुंबई दि. २७ मागिल लोकसभाआणि विधानसभा निवडणूकीत बेरोजगारांच्या प्रश्नावर तरूणांची मते घेवून सत्तेत आलेल्या भाजपच्या सरकारने मोठा गाजावाजा करून गुंतवणूक आणि रोजगार निर्मीतीसाठी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ हे कार्यक्रम सुरू केले मात्र राज्य सरकार राज्यात रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याची माहिती, माहिती अधिकारातुन पुढे आल्याने या महत्वपूर्ण कार्यक्रमाची पोलखोल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील गुंतवणूक आणि रोजगारासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत याबाबत माहिती मागितली होती.त्याला मिळालेल्या उत्तरामुळे मेक इन महाराष्ट्राची पोलखोल झाली आहे. काही दिवसात राज्य सरकार आपले तीन वर्ष पूर्ण करीत असले तरी गुंतवणूकीचे दावे किती खरे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात नोव्हेंबर २०१६ पर्यंत विविध उद्योग प्रकल्पातुन ११ कोटी ३७ लाख ७८३ कोटींची गुंतवणूक होईल असे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात केवळ २ कोटी ६९ लाख ८१४ कोटी रूपयांचीच गुतंवणूक झाली आहे.