अखेर शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
मुंबई दि.२७ विविध गोंधळामुळे चर्चेत असलेल्या छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे( कर्जमाफी ) पैसे अखेर पात्र शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज २ लाख ३९ हजार ६१० शेतकऱ्यांच्या खात्यात ८९९.११ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेअंतर्गत ११ बँकांना ३९२ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.
अनेक वायदे करूनही याद्यांच्या घोळामुळे या योजनेचा लाभ शेतक-यांना मिळण्यास उशीर झाला होता मात्र आज या निकषामध्ये बसणा-या १ लाख १ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यात ६७१.१६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात येणार आहेत.
राज्यातील कर्जमाफीच्या गोंधळाची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी श्रीकर परदेशी यांनी राज्याचे सहकार सचिव, कृषी सचिव आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांशी चर्चा केली. दोन दिवसात या सर्व घोळाबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.