मुंबई नगरी टीम
मुंबई । अमरावती मध्ये घडलेल्या दंगलीवरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच अमरावती येथिल दंगल नियोजन पद्धतीने भडकवली गेली असून यासाठी मुंबईतून पैसे पाठविण्यात आले असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक केला आहे.जेव्हा सर्व रस्ते बंद होतात,तेव्हा भाजपकडून दंगलीचे अस्त्र बाहेर काढले जाते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही.अशा विनाशी राजकारणाचा त्यांनी निषेध केला.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.अमरावती येथिल दंगल ही नियोजन पद्धतीने भडकवली गेली आहे.याची चौकशी पोलिस करत असून,यासाठी मुंबईतून पैसे पुरविण्यात आले असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी महाविकास आघाडीचे सरकार उखडवून टाकू असा इशारा दिला होता.त्यांच्या वक्तव्याचा समाचार मलिक यांनी घेतला.केंद्राय यंत्रणांच्या माध्यमातून बिगर भाजप सरकारला धमकावले जात आहे.बंगाल मध्येही हा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला.बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्यांना धमकावून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले.पण जेव्हा बंगाल मध्ये तृणमूलचे सरकार आले तेव्हा याच नेत्यांनी पुन्हा तृणमूल मध्ये प्रवेश केला.त्यामुळे पैसे देवून किंवा केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून सरकारे उखडू शकत नाही हे भाजपला समजायला हवे असा इशाराही मलिक यांनी दिला. लक्ष्मी दर्शन हे महाविकास आघाडीचे चुंबक नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा हे महाविकास आघाडी सरकारचे चुंबक आहे अशा शब्दात त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहे.
वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला.यामुळे काही ठिकाणी बंद पुकारला गेला.ज्याला हिंसक वळण लागले.काही ठिकाणी दगडफेकही झाली.अशा सर्व लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालेगावमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये देखील अशीच अप्रिय घटना घडली. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक करण्यात आल्याची चर्चा झाली. मात्र त्यात तथ्य नसून, मुफ्ती ईस्माईल यांनी काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर मुफ्ती ईस्माईल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.त्यांच्यासोबत निवडून आलेले सर्व नगरसेवक देखील एमआयएममध्ये गेले होते.त्यामुळे नगरसेवक हे कागदोपत्री राष्ट्रवादीचे असले तरी ते एमआयएममध्ये गेलेले आहेत असा खुलासाही मलिक यांनी केला.
कार्डेलिया क्रूझ प्रकरण दाबण्यासाठी आता एनसीबीची गडबड सुरु आहे. या प्रकरणाची तीन ठिकाणी चौकशी सुरु आहे. मुंबई पोलिसांची एसआयटीही चौकशी करत आहे. सत्य परिस्थिती समोर येईलच असेही मलिक म्हणाले. एनसीबीच्या चांडाळ चौकडीविरोधात हजारो कोटी रुपये खंडणी घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात माझी लढाई आहे एनसीबीच्या विरोधात नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले.काशिफ खान याचा नमस्क्रे नावाचा ब्रॅण्ड आहे या ब्रॅण्डचा पेपर एनसीबीने छाप्यात ताब्यात घेतले आहेत. काशिफ खान सध्या गोव्यात आहे. रशियन माफीया येथून ड्रग्जचा व्यवसाय करतो. काशिफ खानचा ब्रॅण्ड पेपर आहे.छाप्यात ते जप्त करण्यात आले असताना मग वानखेडे का त्याला वाचवत आहे असा आरोप करतानाच गोव्यात का छापे मारले जात नाही. महाराष्ट्रातच का मारले जातात ? असा सवालही मलिक यांनी केला आहे.समीर वानखेडे हे गुजरातमधील लॅबवर विश्वास करत नाही. म्हणजे मोदींच्या राज्यातील लॅबवर समीर वानखेडे विश्वास का ठेवत नाहीत. गुजरातमधील मोरबीमध्ये ड्रग्ज पकडले गेले.पाकिस्तानमधून समुद्रमार्गाने गुजरातमध्ये ड्रग्ज येत आहे. हा खेळ गुजरातमधून सुरु आहे.वानखेडे हे फर्जीवाडा करत आहेत असा पुन्हा एकदा पुनरुच्चार मलिक यांनी केला.