शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवा बंधनकारक
मुंबई, दि. ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना बंधपत्रित सेवा बंधनकारक करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय सेवा पुरविण्याची एक सुवर्णसंधी शासन बंधपत्रित सेवेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची प्राथमिक जबाबदारी ही तळागाळातील सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उत्तम वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टर) याची निर्मिती करणे हा आहे. या शिक्षित डॉक्टरामार्फत राज्यातील सुमारे ६ कोटी आदिवासी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी शासन घटनात्मक दृष्ट्या कटिबध्द आहे, अशी माहितीही महाजन यांनी दिली.
बंधपत्रित सेवेच्या माध्यमातून शासन तळागाळातील जनतेला व नव्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेले वैद्यकीय व्यवसायी यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ शहरी भागामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर निर्माण करणे हा शासनाचा मानस नसून महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी भागातील सामाजिक व आरोग्य सेवेची जाणीव असलेले डॉक्टर निर्माण करणे यासाठी शासन अतिशय कमी शुल्कामध्ये वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करुन देत असून बंधपत्रित सेवा हाही त्याचा भाग आहे.