नार्वेकरांनी अल्टिमेटम देण्याएवढे वाईट दिवस आले नाहीत!
मुंबई दि.३१ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास सरकारचा पाठिंबा काढू असा निरोप घेवून मिलिंद नार्वेकर वर्षावर गेले होते. या बातमीत तथ्य नसून, उद्धव ठाकरे आणि माझ्यात चांगला संवाद असल्याने नार्वेकर माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील इतके माझे वाईट दिवस आले नाहीत. नार्वेकर चांगली व्यक्ती आहे, पण माझ्यावर अजून तशी वेळ आलेली नाही, अशी कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली.
राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही, आम्ही योग्य रितीने संवाद साधतो त्यामुळे आम्हाला मध्यस्थांची वा बैठकांची गरज भासत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच मी कपटी मित्र वगैरे कोणालाही म्हटलेले नाही आणि आमच्या मित्राला ( शिवसेना) तर नाहीच नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका करण्याची मित्र पक्षाच्या काही नेत्यांना सवय आहे. सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करायची, विरोधकांची भूमिका पार पाडायची, त्याच वेळी स्वपक्षाकडून शाबासकी मिळेल अशी अपेक्षा असते, मात्र ही भूमिका योग्य नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मी सामना वाचत नाही असाही टोला लगावला.
मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईतील फेरीवाल्यांचा मुद्दा गाजत आहे. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अवैध फेरीवाले हटवलेच पाहिजेत. अशा फेरीवाल्यांना काढले जाईल. ते काम सरकार करेल. परंतु फेरीवाला प्रकरणाला मराठी-अमराठी असा रंग देणे चुकीचे आहे. ही शुद्ध राजकीय बदमाशी आहे. त्याचवेळी फेरीवाल्यांकडून मारहाण होणेही अयोग्य आहे. मारहाण करणाऱ्यांना सोडणार नाही, असेही मौख्यमंत्र्यांनी स्पष्ट करतानाच फेरीवाला धोरण तयार करुन त्यांचे नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार, महापालिका शक्य त्यांना कायमस्वरुपी परवाना देईल आणि शक्य नाही त्यांना हटवणार आहे. अनधिकृत फेरीवाले हटवलेच पाहिजेत आणि कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.