मुंबई नगरी टीम
मुंबई । आज देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. पंजाब वगळता भाजपला चार राज्यात मोठे यश मिळाले आहे.या पार्श्वभूमीवर ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ अशी गर्जना भाजपच्या नेत्यांकडून दिली आहे.यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपला जशासतसे प्रत्युत्तर दिले आहे.भाजपचे नेते अभी महाराष्ट्र बाकी है, असे म्हणत असतील तर ‘तो महाराष्ट्र भी तैयार है’ असे पवार यांनी भाजपला आव्हान दिले आहे.पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला.पंजाब वगळता उत्तर प्रदेशसहित इतर तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता राखली आहे.चार राज्यात मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी आता महाराष्ट्राची वेळ असल्याचे म्हटले आहे. निकालानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या आमदारांनी ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा दिल्या.त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.’अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा पवार यांनी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.पंजाब असं एक राज्य होते ज्याठिकाणी कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे.पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.’आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे.त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्यापध्दतीने प्रशासन दिले. त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे.पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे.दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ ला झाला असे स्वच्छ दिसते असेही पवार यावेळी म्हणाले.
त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचे राज्य स्थापन झाले आहे असेही पवार यांनी सांगितले.लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा असेही पवार म्हणाले.आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही.आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे.एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत त्यामुळे पुढची नीती ठरवण्याची पाऊले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे असेही पवार यांनी सांगितले.