मराठा समाजातील तरुणांना त्वरित कर्ज वाटप करा
मुंबई, दि. ३१ मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करता यावे यासाठी तीन योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करून उपसमितीसमोर मंजुरीसाठी ठेवावेत आणि त्वरित कर्ज वाटप सुरू करावे, असे निर्देश आज मराठा मोर्च्याच्या मागण्यांसंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.
मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यापूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या बाबींचा सुरुवातीला आढावा घेण्यात आला.यावेळी पाटील म्हणाले, मराठा समाजातील नागरिकांनी रोजगार उभारावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत १० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, ५० लाखांपर्यंत गट कर्ज परतावा योजना आणि एफपीओ कर्ज योजना आखल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणी आठवड्याभरात प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मंत्रिडळ उपसमितीकडे पाठवावा. ओबीसी प्रमाणपत्र सहजपणे मिळण्यासाठी शासन निर्णय जारी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असलेली क्लिष्टता संपविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पाटील यांनी दिले.