एसटी कर्मचाऱ्यांचे फक्त संपकाळातील वेतन कपात होणार
मुंबई, दि. ३१ : एसटी कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्या केलेल्या संपामुळे या कर्मचा-यांचे ३६ दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता मात्र या निर्णयामुळे कर्मचा-यांमध्ये नाराजी पसरताच आज झालेल्या बैठकीत संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे कर्मचारी संपकाळातील ४ दिवसांसाठी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
मंत्री दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.महामंडळाचा कोणताही कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेला तर संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी एक दिवस विनाकाम – विना वेतन व ८ दिवसांचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल, असा निर्णय एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या २९ जानेवारी २००५ रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या संपकालावधीसाठी कर्मचाऱ्यांचे ३६ दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये यासाठी नुकत्याच झालेल्या संपाच्या बाबतीत या निर्णयास स्थगिती देण्याचा निर्णय मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत ३६ दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.