मुंबई नगरी टीम
मुंबई । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून,गुढीपाडव्याच्या शोभायात्रा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे सांगतानाच राज्यातील कोरोनाचे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी मास्क मुक्तीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निर्बंधांबाबत माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसर्व नियम पाळून आणि काळजी घेऊन सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले.राज्यात निर्बंध हळहळू शिथील करत आहोत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच गुढीपाडव्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुकांना परवानगी देण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेतला जाणार असल्याचे सांगतानाच शोभायात्रांबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.तर काही प्रमाणात निर्बंध कायम आहेत.मात्र, मास्क मुक्तीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्य देशात अजूनही कोरोना पूर्णतः नियंत्रणात आलेला नसल्याने जगभरात कोरोनाचे पूर्ण उच्चाटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मास्कपासून मुक्ती मिळणार नाही.मात्र मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांना योग्य वाटल्यास ते तसा निर्णय घेऊ शकतील असे टोपे यांनी स्पष्ट करीत नेहमीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा.परदेशातली परिस्थिती पाहता मास्क वापरणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून निर्बंध लावण्यात आले होते.आता एक मास्कचा नियम सोडला तर बऱ्यापैकी नियमांचे शिथिलीकरण केले आहे असेही त्यांनी सांगितले.लसीकरण वाढावे म्हणून लोकल प्रवासातील निर्बंध कायम ठेवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.