मुंबई नगरी टीम
मुंबई । महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी,कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत.’चाय पे चर्चा’ परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी महागाई पे चर्चा कधी करणार ? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की,देशातील जनतेची सकाळ सध्या महागाईच्या बातमीने होते. दररोज वाढणा-या इंधनाच्या किंमतीने आणि महागाईने सर्वसमान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. दहा दिवस दररोज पेट्रोल डिझेलची दरवाढ करुन आज व्यावसायीक गॅस सिंलिंडर २५० रुपयांनी महाग केला. या महागाईचे सर्वच स्तरातील लोकांना चटके बसत आहेत. वाढत्या महागाईने चहा सुद्धा महाग झाला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. या महत्वाच्या विषयावर लक्ष देण्यास पंतप्रधान मोदी यांना वेळ नाही मात्र विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली परिक्षा पे चर्चा करत आहे. अशीच चर्चा त्यांनी देशातील महागाईसह इतर ज्वलंत प्रश्नावरही करायला पाहिजे.ज्या व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल ठोस माहिती नाही, स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, ती बोगस आहे असा आरोप केला जात आहे तेच विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थी व पालक दोघांनाही भवितव्याच्या चिंतेने ग्रासले असून पंतप्रधान मोदी मात्र त्यांना कोरडे सल्ले देण्याचे काम करत आहेत. गटारातल्या गॅसवर चहा करण्याचा किस्सा सांगणाऱ्या मोदींकडून विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यावा, असेही पटोले म्हणाले.
पटोले यांनी यावेळी नागपूरचे वकील सतिश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरही भाष्य केले. केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरले जात आहे.राजकीय विरोधकांना लक्ष्य करत असतानाच आता त्यांच्याशी संबंधित लोकांवरही कारवाई केली जात आहे.नागपूरचे विधिज्ञ सतीश उके यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या तक्रारी केल्या असून त्यातील काही प्रकरणात भाजपाचे नेते कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात.म्हणूनच ईडीच्या मार्फत त्यांच्यावर षडयंत्र रचून कारवाई केली त्यासाठी मुंबईचे ईडी पथक नागपुरात आणून तसेच केंद्रीय पोलीस दल आणून ही कारवाई केली.या कारवाईवेळी नागपूर ईडी व पोलिसांनाही अंधारात ठेवण्यात आले. सतीश उके यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडली आहे.ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर मात्र सतिश उके हे फक्त नाना पटोले यांचेच वकील आहेत असे चित्र निर्माण करुन माझी बदनामी केली जात आहे पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत असे पटोले म्हणाले.
शेअर मार्केट घोटाळा करणारा हर्षद मेहताचे वकीलपत्र भाजपाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी घेतले होते.वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकीलपत्र घेतले होते तसेच संसद हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफजल गुरुचेही वकीलपत्र जेठमलानी यांनी घेतले होते. माझा आणि सतिश उके यांचा संबंध लावला जात असेल तर मग त्याच न्यायाने राम जेठमलानी व अरुण जेटली यांचाही संबंध लावायचा का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत आहे. एससी, एसटी, ओबीसी समाजासह सर्वच घटकांचे काँग्रेसला समर्थन वाढत आहे. काँग्रेसला मिळणारे हे वाढते समर्थन भारतीय जनता पक्षाला अडचणीचे ठरत असल्याने सतीश उकेंच्या कारवाईच्या आडून मला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे पण आम्ही अशा बदनामीला घाबरत नाही, असेही पटोले म्हणाले.