डोंबिवलीकरांच्या समस्या घेवून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबई दि.२ डोंबिवली मधिल जिल्हाधिकारी जागेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. डोंबिवलीतील जिल्हाधिकारी जमिनीचा पुनर्विकास आणि इको पाॅलीसीवर या बैठकीत चर्चा झाली मात्र फेररीवाला मुद्यावर कसलीही चर्चा झाली नसल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसेने फेरीवाला मुद्दा लावून धरला असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र आजची भेट ही डोंबिवलीतील जिल्हाधिकारी जमिनीवरील पुनर्विकासाबाबत होती असे नांदगावकर यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकरांसोबत संपर्क साधून नजराणा शुल्क संदर्भातील अडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या. स्टार्टअप इंडियामध्ये कल्याण डोंबिवलीतील युवकांच्या समस्या ऐकून त्यादेखील मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली दौरा केला होता या दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसोबत बैठक घेवून त्याच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. आजच्या भेटी दरम्यान डोबिवलीतील नागरीकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या वर्षा भेटी वेळी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे उपस्थित होते. राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.