मुंबई नगरी टीम
मुंबई । समाजातील वंचित,उपेक्षित,श्रमिक,कष्टकरी यांना महाविकास आघाडी सरकारने न्याय दिला तर हा घटक आक्रोश करणार नाही.त्यामुळे दुर्बल व वंचित धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे,ही आमची मागणी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले.
सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती के.सी.कॉलेज सभागृह, चर्चगेट, मुंबई येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायला गेला तर तास न तास कमी पडतील. अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व सर्वव्यापी, सर्वस्पर्शी होते. त्यांच्याकडे पाहत असताना एक कुशल प्रशासक म्हणून पाहिले जाते. ज्या काळात अत्याधुनिक साधनसामग्री, आधुनिक नेटवर्क उपलब्ध नसताना वेगवेगळ्या विषयांचे नियोजन कसे करावे, राज्यकारभार कसा चालवावा याचा त्या आदर्श मानल्या जातात. म्हणून एवढ्या वर्षानंतर त्यांच्या प्रशासकीय कारभाराचे आपण कौतुक व गौरव करत आहे.
अहिल्यादेवी या पराक्रमी,लढवय्या होत्या. त्यांचे पराक्रम नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही वेळेला त्यांचा दृष्टिकोन पाण्याच्या संदर्भात दूरदृष्टीचा होता.म्हणून पाण्यासाठी विहिरी काढणे, साठवणूक करणे, साठवण तलाव करणे, यावर त्या आग्रही असायच्या. विधवांच्या विषयांमध्ये विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीमध्ये पहिला वाटा मिळाला पाहिजे हे सांगणाऱ्या अहिल्यादेवी होळकर होत्या. मुलांना दत्तक घेण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. अन्नछत्र तयार करणे, धर्मशाळा बांधणे अशा वेगवेगळ्या घटकांना ज्याची गरज असेल त्याची त्यांनी उभारणी केली. त्यांचे धर्माच्या बाबतीत कामही सर्वश्रुत आहे. आजही आम्ही मंदिराच्या विषयावरून वादविवाद करतोय. आजही लोकांना मंदिर व धर्माच्याबाबतीत लढावे लागतेय, हे दुर्दैव आहे. म्हणून त्यांच्या स्मृती आज प्रेरणादायी आहेत. त्याही वेळेला धर्माचे गुणगान, धर्माचे रक्षण यासाठी अहिल्यादेवी होळकर आघाडीवर होत्या. मंदिराचा जीर्णोद्धार करणे, मंदिरांची प्रतिष्ठापना करणे, देवी देवतांची स्थापना करणे यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी पुढाकार घेतला होता. आपले हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत आणि म्हणून सर्वात प्रथम आपण सर्व समाज बांधवांनी संघटित होण्याची गरज आहे. आमच्या मागण्या या किरकोळ व छोट्या आहेत. आम्हाला आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे असे सांगताना दरेकर म्हणाले की, आम्ही आमच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करू. आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी कुठल्याही पक्षाचे दुमत नाही. परंतु त्याला गती देऊन ते लवकरात लवकर मिळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू.
धनगर समाजाला आर्थिक पाठबळ देताना सरकारच्या वित्त विभागाने हात आखडता घेता कामा नये.२८ एप्रिलला वेगवेगळ्या महामंडळाना आपण निधी दिला मग अहिल्यादेवी महामंडळाला एक कवडी देता आली नाही. उन्हं, वारा, पावसात आमचा धनगर समाज काम करतो त्याला ४००-५०० कोटी रुपये का देऊ शकत नाही? बिल्डरच्या सबसिडीसाठी हजारो कोटी रुपये देतो त्यातला एक चतुर्थांश रूपये दिले तरी पुरेसे आहे. दारूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यात येतात, त्या कशासाठी देतो, त्या बंद करा, त्यापेक्षा जे वंचित आहेत, त्यांना थोडे आर्थिक पाठबळ दिले तरी हा समाज आक्रोश करणार नाही.