मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यानंतर राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येणार असल्याची चर्चा होती.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार असा अंदाज बांधला जात असतानाच राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.आज एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे.तर देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले मात्र शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे मंत्री असतील असेही फडणवीस यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी राजभवन येथे जावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी आश्चर्यचकित करणारी घोषणा केली.शिंदे यांचा आज एकट्याचा ७: ३० वाजता शपथविधी होणार आहे.शिंदे यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा असला तरी फडणवीस हे मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत.भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना आश्चर्यचकित करणारी घोषणा केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असे फडणवीस म्हणाले आहेत.लवकरच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपाच्या आमदारांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. फडणवीस हे मंत्रिमंडळात येणार नसले तरी हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझी देखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार आहे अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.