चंद्रकांतदादा खड्डेमुक्त रस्ता दाखवा, हजार रूपये मिळवा
मुंबई दि.३ राज्यातील खड्ड्यावरून राजकारण तापू लागले असून, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “सेल्फी विथ खड्डे” काढल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्या सेल्फीद्वारे मांडल्या आहेत.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ‘खड्डे दाखवा’ आणि हजार रुपये मिळवा’ असे आवाहन केले होते. खर तर, चंद्रकांतदादा यांनीच राज्यात एखादा खड्डेमुक्त रस्ता दाखवावा आणि हजार रुपये मिळवावेत. राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी काल सेल्फी विथ खड्डा अभियानांतर्गत खड्ड्यासोबत फोटो शेअर केला होता. मी आज रायगड जिल्ह्यातील दिघी-पुणे राज्य महामार्गावरील खड्ड्यांचा फोटो पोस्ट करत आहे. राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेचे वास्तव या अभियानातून समोर येत आहे. आता तरी सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा सवाल समाज माध्यमातून तटकरे यांनी केला आहे.