मुंबई नगरी टीम
मुंबई । शपथविधी होवून दोन दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी खाते वाटप जाहीर करण्यात आले नाही.येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणा-या शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम ज्या मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अशा मंत्र्यांची नावे आणि संबंधित जिल्ह्याची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.एकूण १९ जिल्ह्याच्या ठिकाणी मंत्र्यांच्या हस्ते तर १५ ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.अमरावती येथे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मात्र १९ जिल्ह्यात ज्या मंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण होणार आहे तेच मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कायम ठेवण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार झाल्यावर उर्वरीत १६ जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर करण्याची शक्यता आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार नागपूर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चंद्रपूर येथे सुधीर मुगंटीवार यांच्या हस्ते,पुणे येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते,सातारा येथे शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर.गिरिष महाजन नाशिक,दादाजी भुसे धुळे,गुलाबराव पाटील जळगाव, रविंद्र चव्हाण ठाणे, मंगलप्रभात लोढा मुंबई, दीपक केसरकर सिंधुदूर्ग, उदय सामंत रत्नागिरी,अतुल सावे परभणी, संदीपान भुमरे औरंगाबाद, सुरेश खाडे सांगली, विजयकुमार गावीत नंदूरबार,तानाजी सावंत उस्मानाबाद, अब्दुल सत्तार जालना तर संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथे ध्वजारोहण होणार आहे.अमरावती येथे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते तर उर्वरीत जिल्ह्याच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार झाला नसल्याने १९ जिल्ह्याच्या ठिकाणी मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने पूर्ण विस्तार होताच १६ जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात येतील.मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार १९ जिल्ह्याचे पालकमंत्री हे संबंधित मंत्री असतील अशी शक्यता आहे.