मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील सत्ता गेल्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करीत नाराजी व्यक्त केली आहे.ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो, असे सांगून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता,असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
येत्या १७ ऑगस्ट पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून,या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र सभापती यांना दिले होते.त्यानुसार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती नंतर आता महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेनेने परस्पर निर्णय घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणे आवश्यक असताना तशी चर्चा करण्यात आली नसून,आम्हाला विचारात घेतले गेले नाही.या पदावर निवड कुणाचीही होवो,मात्र चर्चा होणे गरजेचे होते असे सांगून या निवडीला विरोध असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही तर ही आघाडी एका वेगळ्या परिस्थितीत केल्याचे पटोले म्हणाले.जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती.आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली असल्याने कायमस्वरूपी असा शब्द आम्ही वापरला नाही असेही पटोले यांनी म्हटले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडी वेळी आम्ही बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली होती.ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे.मात्र शिवसेनेने याबाबत चर्चा केली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.याबाबत शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर ते अधिक चांगले झाले असते असेही पाटील यांनी सांगितले.विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही होती.मात्र शिवसेनेने अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेला स्थान देण्यात आले नव्हते.या समितीत स्थान देण्याची शिवसेनेची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कालच फेटाळून लावली.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी १७ ते २६ ऑगस्ट पर्यंत ठरविण्यात आला आहे. शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दहिहंडीची सुट्टी असल्याने तर शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने या तीन दिवसात कामकाज होणार नाही.शिंदे- फडणवीस सरकारचे पहिलेच अधिवेशन असून,अधिवेशनाच्या पहिल्याच अध्यादेश पटलावर ठेवण्यात येवून २०२२-२०२३ च्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात येणार आहेत.१८ ऑगस्ट रोजी शासकीय कामकाज तर २२ ऑगस्ट रोजी पुरवण्या मागण्यांवर चर्चा करण्यात येवून मतदान घेण्यात येईल.मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी पुरवण्या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल.बुधवारी २४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम आणि शासकीय कामकाज तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासकीय कामकाज घेण्यात येणार आहे.